
नाशिक: इगतपुरी तालुक्यातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन मिळत असल्याने गुरुवारी दुपारपासून शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. कडाक्याच्या थंडीत रात्री उशिरापर्यंत हे विद्यार्थी चांगल्या भोजनाची प्रतीक्षा करत होते. मात्र, आदिवासी विकास विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याने आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
मुंढेगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून तालुक्यासह आसपासच्या एकलव्य निवासी व शासकीय आश्रमशाळांमधील २५ ते ३० हजार विद्यार्थ्यांसाठी भोजन पुरवले जाते. मात्र, या भोजनाचा दर्जा अतिशय खराब असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. शाळा व्यवस्थापनाला तक्रारी करूनही काही सुधारणा झाल्या नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास परिषदेच्या मदतीने आवाज उठवला.
परिषद अध्यक्ष लकी जाधव यांनी विद्यार्थ्यांना घेऊन संबंधित स्वयंपाकगृहाला कुलूप लावण्याची तयारी दर्शवली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली, मात्र सकाळचे भोजन दुपारी चार वाजता मिळाले आणि तेही निकृष्ट दर्जाचे होते. रात्रीपर्यंत पोषक आहार, दूध किंवा फळे उपलब्ध न झाल्याची तक्रारही विद्यार्थ्यांनी केली.
लकी जाधव यांनी आदिवासी विकास विभागावर कोट्यवधींचा निधी असूनही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण भोजन न पुरवण्याचा आरोप केला आहे. तसेच, तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याचीही माहिती देत, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.