जालना जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसाठी अभ्यागत भेट व तक्रार निवारण दिन निश्चित

जालना/ कादरी हुसैन; जालना जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी आता अधिक सोयीस्कर आणि सुलभ वेळ निश्चित करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल यांनी दिलेल्या आदेशानुसार, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4:00 ते 6:00 या वेळेत अभ्यागतांसाठी उपलब्ध असतील. या वेळेत नागरिक त्यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी मांडू शकतात.
जर प्रभारी अधिकारी काही कारणास्तव उपस्थित नसतील, तर नागरिक त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधू शकतात. या उपाययोजनेमुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागणार नाही आणि त्यांच्या समस्यांचे त्वरीत निराकरण होईल.
तसेच, नागरिकांच्या तक्रारींचे समाधान करण्यासाठी प्रत्येक शनिवारी सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 या वेळेत पोलीस स्टेशन स्तरावर तक्रार निवारण दिन ठेवण्यात आला आहे. या तक्रार निवारण दिनासाठी वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, आणि पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचे मासिक वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
नागरिकांना अधिक माहिती मिळावी यासाठी पोलीस स्टेशनच्या दर्शनी भागात अभ्यागत भेटीची वेळ आणि तक्रार निवारण दिनाची माहिती असलेले बोर्ड लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
श्री. अजय कुमार बंसल यांनी नागरिकांना या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे जनतेचे पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल आणि त्यांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवल्या जातील.