
बुलढाणा: शेगाव तालुक्यात अनामिक आणि विचित्र आजाराचा प्रादुर्भाव कायम असून, रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. आजअखेर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १९७ वर पोहोचली आहे. यापैकी शेगाव तालुक्यात १९० तर नांदुरा तालुक्यात ७ रुग्ण आढळले आहेत. आठवड्याभरात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतील बारा गावांमध्ये या आजाराचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे.
पाच हजार घरांचे सर्वेक्षण, रुग्णसंख्येत वाढ
पहुरजीरा गावात सर्वाधिक ३५ रुग्ण असून, कठोरा (२८), कालवड (२४), बोण्डगाव (२३), माटरगाव बुद्रुक (२३), तरोडा खुर्द (१३), मच्छीन्द्रखेड (११), निंबी (१०), भोनगाव (१०) या गावांतील रुग्णसंख्या दुहेरी आहे. हिंगणा (५) आणि घुई (८) या गावांत तुलनेने कमी रुग्ण आढळले आहेत. सुमारे २५,००० लोकसंख्येच्या बारा गावांतील ४,६५५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये हे रुग्ण आढळले आहेत.
‘आयसीएमआर‘ पथकाकडून तपासणी सुरू
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनुसार, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) शास्त्रज्ञ शेगावात तळ ठोकून आहेत. दिल्ली, चेन्नई, पुणे, आणि भोपाळ येथील तज्ज्ञांच्या टीमद्वारे रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी, सर्वेक्षण, आणि मूळ कारणांचा शोध घेतला जात आहे. विशेष पथकाने आजाराचे निदान होईपर्यंत शेगाव न सोडण्याचा निर्धार केला आहे.
राज्य आणि केंद्र पातळीवरील आरोग्य यंत्रणांचे या प्रकरणाकडे लक्ष असून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत.