
जालना/कादरी हुसैन
जालना शहरातील जमुनानगर भागात राहणारी तरुणी मोनिका सुमित निर्मळ (वय 30) ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत होती.पतीपासून विभक्त राहणारी मोनिका निर्मळ ही जालना येथे माहेरी आईसोबत राहून रेल्वेने दररोज छत्रपती संभाजीनगर अपडाऊन करीत होती.
दि. 6 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी आली नाही व तिचा मोबाईलही लागत नव्हता, त्यामुळे चिंतातूर झालेल्या आईने दुसऱ्या दिवशी थेट कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली._
त्यानंतर दोन दिवसांनी मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या नातवाईकांना मी सुखरूप असून, मी लग्न केले असून, तुम्हाला एक वर्षांनी भेटायला येईल, अश्या आशयाचा मेसेज आला. या मोबाईल नंबरवर परत फोन केला तर तो पुन्हा लागलाच नाही, त्यामुळे नातेवाईकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण झाल्या होत्या. नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन, याप्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली होती. पोलीस अधीक्षक बन्सल यांनी याप्रकरणी कदीम जालना पोलीसांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देताच पोलिसांची तपासचक्रे गतीने फिरली. कदीम जालना पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर शेख इरफान शेख पाशा (रा. लासुर स्टेशन) यास ताब्यात घेऊन चार दिवसांपूर्वी जालना येथे आणून चौकशी केली होती, मात्र त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने त्याला सोडून दिले होते. आरोपीला सोडून दिले असले तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे बारकाईनं लक्ष होते.
पोलिसांनी इरफानच्या मोबाईलच्या कॉलडिटेल्सबरोबरच लासुर स्टेशन येथील काही सीसीटीव्ही फुटेज काढले होते.मोनिका हिच्यासोबतचे तासनतास केलेले मोबाईल संभाषण आणि 6 फेब्रुवारीला लासुर स्टेशन येथे फुटेजमध्ये मोनिका व इरफान दिसल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे इरफान शेख याच्यावर अधिकच संशय बळावल्याने पोलिसांनी त्यास काल ताब्यात घेत, त्याला पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने पोपटासारखे तोंड उघडले. संभाजीनगर रेल्वेस्थानकापासून रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी तिच्याकडे असलेली दुचाकी ती रेल्वे स्थानकावरील वाहनतळावर उभी करीत असे.त्यादरम्यान, मोनिका हिचे वाहनतळावर काम करणाऱ्या शेख इरफान शेख पाशा (वय 35) नामक नराधमासोबत प्रेमसंबंध जुळले होते.
इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही 6 फेब्रुवारी रोजी रेल्वेने लासुर येथे गेली होती.
लासुर येथून जवळच असलेल्या शेतात मोनिकाला घेऊन इरफान गेला होता.
शेतात असलेल्या पडीत घरात असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली असून, त्यानंतर तिचा मृतदेह त्याचठिकानी पुरल्याचे सांगितले होते.
दरम्यान, आज कदीम जालना पोलीसांनी संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्या समक्ष इरफान याने पुरलेला मोनिका हीचा मृतदेह बाहेर काढला.
त्यांनतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.
त्याठिकाणी मोनिकाच्या अंगावरील कपडे जाळल्याचेही आढळून आले आहे.
दरम्यान, इरफान याने मोनिकाने आत्महत्या केल्याचा केलेला बनाव खोटा असून, त्यानेच फाशी देऊन खून करून, पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरून टाकला असावा, असा अंदाज आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस अंमलदार नंदकुमार ठाकूर, दिलीप गायकवाड, शेख अन्सारी आदींनी शिलेगाव पोलिसांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे.