
जालना/कादरी हुसैन
जालना, दि. 5 मार्च 2024–मोरंडी मोहल्ला, जुना जालना येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीला अखेर अ.मा.वा.प्र. कक्ष, जालना यांच्या पथकाने शोधून काढले.
दि. 2 मार्च 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कैकाडी मोहल्ला, जुना जालना येथील रहिवासी सचिन बाबू गायकवाड (वय 21) याने 13 वर्ष 6 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार पोलीस ठाणे कदिम, जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, एक वर्षाचा कालावधी उलटूनही आरोपी व पीडित मुलगी सापडली नव्हती. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने दि. 7 जानेवारी 2025 रोजी हा गुन्हा अ.मा.वा.प्र. कक्ष, जालना यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
अ.मा.वा.प्र. कक्षाच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने तपास करत तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी सचिन गायकवाड हा पीडित मुलीसोबत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील खलकरवाडी येथे ऊस तोडीचे काम करत असल्याची माहिती मिळाली. खात्री केल्यानंतर, पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीला व पीडित मुलीला ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे कदिम, जालना येथे हजर केले.
ही महत्त्वपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री. अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव (स्थागुशा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यात अ.मा.वा.प्र. कक्षाच्या प्रभारी अधिकारी प्रियंका तुपे, पोउपनि रविंद्र जोशी, सपोउपनि संजय गवळी, पोहेकॉ सागर बावीस्कर (स्थागुशा), महिला अंमलदार पुष्पा खरटमल, संगीता चव्हाण, आरती साबळे, रेणुका राठोड व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.