
जालना/कादरी हुसैन
अंबड शहरातील पठाण मोहल्ला येथे शनिवारी (ता. 15) रात्री अनैतिक संबंधाच्या संशयावरून 30 वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मृत कलिम शेख खाजा शेख (वय 30) याचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय तिच्या पतीला आला होता. त्यामुळे त्या महिलेच्या पतीसह त्याचे भाऊ व इतर नातेवाईक हे कलिम शेख याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. शनिवारी रात्री 10.30 वाजता पठाण मोहल्ल्यातील लाहोटी यांच्या घरासमोर सरफराज फेरोज शेख व अन्य तिघांनी मिळून कलिम शेखवर धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कलिम शेख यास तातडीने जालना जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड शहरात खळबळ उडाली.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सरफराज शेख व अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून उर्वरित तिघे अद्याप फरार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल करत आहेत.