लोणार पर्यटनाला बसफेऱ्यांचा अडथळा: प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची गैरसोय

पुणे व अक्कलकोटसाठी थेट बससेवा नाही;प्रशासनाचा टाळाटाळीचा खेळ!” 

लोणार:असलम परवेज
जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणार येथून थेट पुणे आणि अक्कलकोट या महत्त्वाच्या ठिकाणांसाठी बसफेऱ्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवासी, पर्यटक, विद्यार्थी आणि रुग्ण यांच्या मागणीनुसार, लोणार प्रवासी सेवा संघटनेने गेल्या पाच वर्षांपासून पुणे-लोणार बसफेरी सुरू करण्याची मागणी वारंवार विभाग नियंत्रक, पुणे यांच्याकडे केली आहे. 

तसेच, अक्कलकोट बसफेरी मागील वर्षापासून सोलापूर विभाग नियंत्रकांकडे मागितली जात आहे. मात्र, या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असून, सदर बसफेऱ्या सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

दोन्ही बसफेऱ्यांसाठी ३० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रादेशिक व्यवस्थापक, पुणे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. याची प्रत राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित कार्यालयातही पाठवण्यात आली. लोणारहून पुणे व अक्कलकोटसाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना प्रवासादरम्यान बस बदलावी लागते किंवा खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे महिला, वयोवृद्ध व लहान मुलांसाठी प्रवास कष्टदायक ठरत आहे. मात्र  नुकत्याच प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक, पुणे यांनी पत्राद्वारे  सदर बसफेऱ्यांसाठी बुलडाणा विभागाकडे मागणी करावी.अशी सल्ला दिली आहे.

प्रवासी सेवा संघटनेचे अध्यक्ष उस्मान शेख आणि सचिव भागवत खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणारसारख्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध पर्यटनस्थळावरून प्रवाशांसाठी थेट बसफेऱ्या सुरू न होणे हे प्रशासनाच्या अनास्थेचे उदाहरण आहे. या सल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

प्रतिक्रिया:
“लोणार येथे इतर आगारांच्या बसफेऱ्या सुरू आहेत, मात्र पुणे विभागाच्या विविध आगारांच्या बसफेऱ्या लोणारसाठी सुरू करण्यास दुर्लक्ष केले जात आहे.”

– *उस्मान शेख, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघटना, लोणार*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top