
नागपूर: “मांस खाणं हे चुकीचं नाही, मात्र अनियंत्रितपणे मांस खाल्ल्यास त्याचे मानवी आरोग्य आणि भावनांवर गंभीर परिणाम होऊ शकतात,” असे मत श्रृंगेरी महासंस्थान शारदा पीठाचे ७२ वे पीठाधीश शंकराचार्य अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी व्यक्त केले.
नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बनाये जीवन प्राणवाण’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
भारतीय परंपरेचे विशेषत्व
शंकराचार्य म्हणाले, “भारतीय संस्कृतीत मांस खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट परंपरा आहेत. देवाला बळी दिलेलं मांस प्रसाद स्वरूपात ग्रहण करण्याचा प्रघात त्यातील एक आहे. यामुळे मांस खाण्यावर नियंत्रण येते. शिवाय, प्रसादाचं स्वरूप असल्यामुळे त्याचे गुणधर्म बदलतात, ज्याचा परिणाम शरीर आणि मनावर सकारात्मक होतो.”
अनियंत्रित मांस सेवनाचे दुष्परिणाम
“प्राण्यांमध्ये असणाऱ्या भावनांचा परिणाम त्यांच्या मांसावर होतो. अनियंत्रित मांस सेवन केल्यास त्याचा मानवी शरीरावर आणि भावनांवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे मांस खाण्याच्या सवयींवर संयम ठेवणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला नागपूरमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. शंकराचार्यांनी आपल्या भाषणात भारतीय परंपरेतील शाश्वततेवर विशेष भर दिला.
(ही बातमी अपडेट केलेली आहे.)