
जालना/कादरी हुसेन
दुपारी उर्दू हायस्कूल, जालना येथे ऑल इंडिया मुतवल्ली इनामदार ऑर्गनायझेशनच्या वतीने विशेष वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश मुतवल्ली, इनामदार आणि काजी यांच्या अधिकार, जबाबदाऱ्या तसेच वक्फ संपत्तीच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाफीज मोहम्मद नदीम सिद्दिकी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे चेअरमन (राज्यमंत्री दर्जा प्राप्त) होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे सदस्य श्री काजी समीर साहेब, श्री सय्यद इफ्तेखार हाश्मी साहेब तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया मुतवल्ली इनामदार ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी श्री अमजद फारूकी, श्री इमरान शहा, श्री मुश्ताक अली, श्री अजीम मनसबदार व इतर आयोजकांनी केले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस वक्फ मालमत्तेचे संरक्षण आणि व्यवस्थापन यावर सखोल चर्चा करण्यात आली. हाफीज मोहम्मद नदीम सिद्दिकी यांनी वक्फ संपत्तीच्या कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “वक्फ संपत्ती ही समाजाची अमानत आहे, तिचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. मुतवल्ली व इनामदारांनी त्यांचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडले पाहिजे.”
श्री काजी समीर यांनी वक्फ संपत्तीच्या गैरवापरासंदर्भात जनजागृती करण्यावर भर दिला. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “वक्फ संपत्तीच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे. कायद्याच्या मर्यादेत राहून मुतवल्लींनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.”
श्री सय्यद इफ्तेखार हाश्मी यांनी वक्फ मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “वक्फ संपत्तीचा उपयोग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी करणे आवश्यक आहे. तसेच वक्फ मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक मुतवल्ली व इनामदारांनी पुढे यावे.”
कार्यशाळेदरम्यान सहभागी झालेल्या मुतवल्ली, इनामदार व काजींनी त्यांच्या अडचणी आणि प्रश्न मांडले. तज्ज्ञांनी त्यावर उपाय सुचवत योग्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले. वर्कशॉपच्या समारोपात सहभागी झालेल्या मान्यवरांनी वक्फ संपत्तीच्या संवर्धनासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे वारंवार आयोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मुतवल्ली, इनामदार, काजी तसेच समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.