महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाची स्वबळावर लढण्याची तयारी; महाविकास आघाडीत मतभेदाची चिन्हे

विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत.

स्वबळावर लढण्याची घोषणा
खासदार संजय राऊत यांनी आज (११ जानेवारी) माध्यमांशी बोलताना सांगितले, “मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. आता आमची ताकद आजमावण्याची वेळ आली आहे. महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका लढवून पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे. आघाडीत कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याचा फटका पक्षाला बसतो.”

राऊत यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपवर टीकास्त्र
राऊत यांनी यावेळी भाजपवरही निशाणा साधत म्हटले, “महाराष्ट्राच्या राजकारणात विकास आणि सहकार्याची संस्कृती होती. मात्र, भाजपने शत्रुत्वावर आधारित राजकारणाची परंपरा सुरू केली आहे.”

महापालिका निवडणुकीतील हा निर्णय महाविकास आघाडीतील समीकरणे बदलण्यास कारणीभूत ठरतो का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top