
१२ ते १५ गावांमध्ये नागरिकांमध्ये केस गळण्याचे व टक्कल पडण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. या घटनेला १५ दिवस उलटून गेले असूनही आरोग्य प्रशासन अद्यापही याचे कारण शोधण्यात आणि निदान करण्यात अपयशी ठरले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आज इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या तज्ज्ञांचे पथक या भागाचा दौरा करणार आहे. पथक दुपारी १२ वाजता दाखल होऊन केस गळतीच्या कारणांचा शोध घेईल. सुरुवातीला फंगल इन्फेक्शन किंवा दूषित पाणी यामुळे हा प्रकार होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अद्याप या समस्येचं नक्की कारण शोधलं गेलेलं नाही.
प्रकरणातील महत्त्वाच्या घडामोडी:
२६ डिसेंबर: अनेक लोकांच्या डोक्याला खाज येऊन केस गळतीला सुरुवात झाली, तीन ते चार दिवसांत टक्कल पडले.
साम टीव्हीचा अहवाल: बातमी उजेडात आल्यानंतर प्रशासनाने त्वरीत पावलं उचलली.
प्रशासनाची कारवाई: पाण्याचे नमुने आणि रुग्णांचे रक्त-त्वचेचे नमुने तपासणीसाठी पाठवले.
पाणी परीक्षण: नमुन्यात नायट्रेट्स व टीडीएसचे प्रमाण जास्त आढळले.
प्राथमिक अहवाल: फंगल इन्फेक्शन किंवा दूषित पाण्याची शक्यता वर्तवली, मात्र ठोस निदान झालेले नाही.
तपासणी अहवाल: अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने नमुन्यांमध्ये फंगल इन्फेक्शन अथवा रक्तदोष नसल्याचे स्पष्ट केले.
केंद्रीय हस्तक्षेप: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हस्तक्षेप करून ICMR च्या पथकाला दौऱ्याचे आदेश दिले.
गेल्या दोन आठवड्यांपासून परिस्थिती अधिक गंभीर होत असून आता मिशी व हातावरील केस गळण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे आज ICMR पथकाचा अहवाल या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.